कोल्हापूर - फ्रेमवर्क ऑफ फर्टिलायझर सेल प्रकल्प अंमलबजावणीचा आढावा
कोल्हापूर, 10 जून (हिं.स.)। केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या पथदर्शी प्रकल्पाची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून शेतकऱ्यांना खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान करण्यासाठी विविध तांत्रिक
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज राधानगरी तालुक्यात


कोल्हापूर, 10 जून (हिं.स.)। केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या पथदर्शी प्रकल्पाची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून शेतकऱ्यांना खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान करण्यासाठी विविध तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज राधानगरी तालुक्यात भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी तालुका खरेदी-विक्री संघ शाखा, राधानगरी येथे भेट देऊन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान एका शेतकऱ्याचा क्यूआर कोड तयार करून त्याचवेळी स्कॅनिंगद्वारे खत विक्रीची प्रक्रिया प्रत्यक्ष राबविण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत व प्रभावीपणे सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अॅपमध्ये शेतकरी व खत विक्रेत्यांच्या सूचनांनुसार अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये आता शेतकरी क्यूआर कोड तयार करून त्याचवेळी स्कॅनिंगद्वारे तात्काळ खत खरेदी करू शकतात त्यामुळे २४ तास प्रतीक्षा करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तसेच शेतकरी घरबसल्या खताचे बुकिंग करू शकत असल्याने खतासाठी विक्री केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली आहे. दुकानावर जाऊन खत उपलब्ध नसणे अथवा खत खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागणे अशा अडचणींवरही यामुळे मोठ्या प्रमाणात मात होण्यास मदत होत आहे.

अनेक शेतकरी दिवसभर शेतीची कामे करत असल्याने त्यांच्या बोटांचे ठसे स्पष्ट न आल्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचणी येत होत्या. या बाबीचा विचार करून बायोमेट्रिक प्रमाणीकरणासोबतच ओटीपी (OTP) आधारित प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी प्रक्रिया अधिक सुलभपणे पूर्ण करता येत आहे.

याशिवाय अॅपमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील खत विक्री केंद्रांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या परिसरातील तसेच इतर भागातील उपलब्ध खत विक्रेत्यांची माहिती सहजपणे पाहू शकतात. खत उपलब्धतेची माहिती वेळेत मिळाल्याने अनावश्यक हेलपाटे टाळण्यास मदत होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १० जून अखेर या प्रणालीअंतर्गत १६ हजार ७४२ क्यूआर कोड तयार करण्यात आले असून त्याद्वारे ३ हजार १८० मेट्रिक टन खताचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यापैकी ५ हजार ४१२ क्यूआर कोड स्कॅन करून १ हजार ०५७ मेट्रिक टन खताची प्रत्यक्ष विक्री करण्यात आली आहे. ही आकडेवारी शेतकरी व खत विक्रेत्यांकडून प्रणालीला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद तसेच जिल्ह्यातील यशस्वी अंमलबजावणी अधोरेखित करते.

फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल प्रणालीमुळे खत वितरण साखळी अधिक पारदर्शक होत असून खताचा काळाबाजार, अनधिकृत साठेबाजी व कृत्रिम टंचाई रोखण्यास मदत होत आहे. खताचा प्रवाह उत्पादन केंद्रापासून शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल पद्धतीने नोंदविला जात असल्याने प्रत्येक टप्प्यावर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होत आहे. परिणामी पात्र शेतकऱ्यांना योग्य वेळी व योग्य प्रमाणात खत उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अॅपचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. डिजिटल माध्यमांचा स्वीकार करून खत खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande