लातूरमध्ये ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ उपक्रमाला सुरुवात
लातूर, 10 जून (हिं.स.) : ‘पोलीस आपल्या दारी’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवत लातूर जिल्हा पोलीस दलाने शहरी नागरिकांसाठी ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम 15 जून
अमोल तांबे


लातूर, 10 जून (हिं.स.) : ‘पोलीस आपल्या दारी’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवत लातूर जिल्हा पोलीस दलाने शहरी नागरिकांसाठी ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम 15 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असून, पोलीस अधिकारी थेट नागरिकांच्या सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

शहरी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकूण 319 सोसायट्या, कॉलन्या आणि नागरी वसाहतींना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

पोलीस ठाणेनिहाय भेटींचा तपशील

अहमदपूर – 46 ठिकाणे

औसा – 40 ठिकाणे

उदगीर शहर – 33 ठिकाणे

शिवाजीनगर – 31 ठिकाणे

चाकूर – 31 ठिकाणे

गांधी चौक – 31 ठिकाणे

विवेकानंद चौक – 26 ठिकाणे

एमआयडीसी – 26 ठिकाणे

निलंगा – 26 ठिकाणे

उदगीर ग्रामीण – 29 ठिकाणे

विविध विषयांवर जनजागृती

या उपक्रमाद्वारे पोलीस केवळ तक्रारी स्वीकारणार नाहीत, तर नागरिकांना विविध विषयांबाबत मार्गदर्शन आणि जनजागृतीही करणार आहेत. त्यामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल:

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा

सायबर गुन्हे व आर्थिक फसवणुकीपासून बचाव

वाहतूक समस्या, पार्किंग आणि ध्वनीप्रदूषण

घरफोडी रोखण्यासाठी उपाययोजना

अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती

सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था

पोलीस आणि नागरिकांतील दरी कमी करण्याचा प्रयत्न

यापूर्वी ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या ‘पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. शेतकऱ्यांचे वाद, पाणीवाटप आणि शेतीशी संबंधित प्रश्न जागेवरच सोडविल्याने पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला होता.

याच धर्तीवर आता शहरी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस थेट सोसायट्यांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, त्यांच्या दारातच समस्या मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सुरक्षित आणि गुन्हेमुक्त लातूरचे उद्दिष्ट

“नागरिकांनी पोलीस ठाण्यात येण्याची वाट न पाहता पोलीसच त्यांच्या दारात जाऊन मदत करतील,” हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढून परस्पर विश्वास दृढ होईल तसेच सुरक्षित, सुसंवादी आणि गुन्हेमुक्त लातूर घडविण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande