सोलार पॅनल व कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; १३ गुन्ह्यांची उकल, १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 10 जून (हिं.स.)। ग्रामीण भागातील सोलार प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतांमधील सौरऊर्जा यंत्रणा, कॉपर वायर, विद्युत केबल्स व अन्य मौल्यवान साहित्य चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ गुन्ह्यांची उक
पोलीस कारवाई


लातूर, 10 जून (हिं.स.)। ग्रामीण भागातील सोलार प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतांमधील सौरऊर्जा यंत्रणा, कॉपर वायर, विद्युत केबल्स व अन्य मौल्यवान साहित्य चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून १६ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान, ९ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच नंबर चौक परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बालाजी अरुण काळे (रा. सरमकुंडी फाटा, ता. वाशी, जि. धाराशिव) व आकाश उर्फ भैया नवनाथ पवार (रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. शिराढोण पारधी पिढी, जि. धाराशिव) यांचा समावेश आहे.

आरोपींच्या ताब्यातील टाटा व्हिस्टा कारची झडती घेतली असता वाहनात ठेवलेल्या पिशवीत तब्बल ११ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. याबाबत सखोल चौकशी केली असता आरोपींनी लातूर जिल्ह्यातील विविध भागांत सोलार पॅनल, कॉपर वायर, केबल वायर, विद्युत साहित्य तसेच बोअरवेल मोटारींच्या चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान आरोपींनी अरुण उर्फ बल्ली बारीकराव काळे, पिंटू मच्छिंद्र काळे, सुनील बबन शिंदे आणि शाम उर्फ अनिल बबन शिंदे या साथीदारांची नावे सांगितली असून त्यांचा शोध सुरू आहे.

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीने मुरुड, भादा, चाकूर, औसा, रेणापूर, उदगीर आणि एमआयडीसी लातूर परिसरात सोलार पॅनल, कॉपर वायर, विद्युत केबल्स व अन्य साहित्य चोरी करून मोठा आर्थिक फायदा मिळविला होता. पोलिसांनी गुन्हे अभिलेखांची पडताळणी केली असता एकूण १३ गुन्ह्यांची उकल झाली.

यामध्ये मुरुड पोलीस ठाण्याचे ३, भादा पोलीस ठाण्याचे २, चाकूरचे २, औसाचे २, रेणापूरचे २, एमआयडीसीचे १ आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचा १ गुन्हा समाविष्ट आहे.

या कारवाईत आरोपींकडून चोरीच्या मालाच्या विक्रीतून मिळालेली ११ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली टाटा व्हिस्टा कार (किंमत ५ लाख रुपये) तसेच हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (किंमत ५० हजार रुपये) असा एकूण १६ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपींना अटक करून मुरुड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७३/२०२६ मध्ये पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande