
पुणे, 10 जून (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंटस् (MAHIMA) या उपक्रमांतर्गत राज्यातील युवकांना जर्मनीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप तसेच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुरक्षित, पारदर्शक आणि नैतिक पद्धतीने आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आयटीआय उत्तीर्ण अथवा अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी, एमसीव्हीसी तसेच गणित विषयासह उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले युवक या उपक्रमासाठी पात्र आहेत. अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असून, काही कुशल रोजगार संधींसाठी ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच जर्मन भाषा A2/B1 स्तरापर्यंत शिकण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
या उपक्रमांतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण, कौशल्यविकास, रोजगार मार्गदर्शन तसेच जर्मन नियोक्त्यांशी जोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्लंबर, HVAC तंत्रज्ञ, मेकॅट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल, मेटल व मशीन ऑपरेटर तसेच हेल्थकेअर व नर्सिंग या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी https://international.msbsvet.edu.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक महाविद्यालये व संबंधित संस्थांनी या संधींची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु