
लातूर, 10 जून, (हिं.स.)। औसा शहराच्या मध्यवर्ती भागातील टी-पॉईंट परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी, रस्ते अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करून औसा पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वाहतूक सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली असून तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व विभागांमध्ये एकमत झाले.
औसा टी-पॉईंट येथे दुपारी पार पडलेल्या या बैठकीचे आयोजन पोलीस ठाणे औसा यांच्याकडून करण्यात आले होते. सदर बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी औसा श्री. कुमार चौधरी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच पोलीस निरीक्षक श्री. डमाळे यांनी बैठकीचे नियोजन व समन्वय साधला.
बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचे श्री. पाटील, श्री. माने व श्री. तिवारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख श्री. स्वामी, औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. शिंदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
औसा टी-पॉईंट हा राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांचा संगमबिंदू असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना, व्यापाऱ्यांना तसेच प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर वेगवान वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची बाबही बैठकीत अधोरेखित करण्यात आली. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.
बैठकीत खालील महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला :
औसा टी-पॉईंट परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना राबविणे.
नगरपालिकेच्या अखत्यारीतील बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून वाहतुकीवर प्रभावी देखरेख ठेवणे व कायदा-सुव्यवस्था बळकट करणे.
सारोळा रोडसह औसा शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची रुंदी उपलब्ध करून देणे.
राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि इतर वाहतूक नियंत्रण साधनांची उभारणी करणे.
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी टी-पॉईंट परिसरातील झेब्रा क्रॉसिंग नव्याने रंगविणे तसेच आवश्यक ठिकाणी रस्ता सुरक्षा चिन्हे बसविणे.
वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती वाढवून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे.
बैठकीदरम्यान सर्व विभागांनी प्रशासनातील परस्पर समन्वय वाढवून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. वाहतूक व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नातूनच प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना शक्य असल्याचे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
औसा पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली ही बैठक भविष्यातील वाहतूक व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून या निर्णयांच्या अंमलबजावणीनंतर औसा शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, रस्ते अपघातांचे प्रमाण घटण्यास तसेच नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांनाही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. “सुरक्षित वाहतूक ही सामूहिक जबाबदारी असून प्रशासन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच अपघातमुक्त, सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकते,” असा संदेश बैठकीतून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis