
जळगाव, 10 जून (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै 2026 या कालावधीत इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. 10 वीची परीक्षा 16 जून ते 30 जून 2026 दरम्यान तर 12 वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै 2026 या कालावधीत पार पडणार आहे.
या बैठकीला जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्य) सतीश परदेशी तसेच पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडाव्यात, तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत विभागाने दक्षता घ्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
जळगाव जिल्ह्यात 12 वी साठी 8 परीक्षा केंद्रे आणि 10 वी साठी 14 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 12 वी साठी 8 परिरक्षक केंद्रे आणि 10 वी साठी 7 परिरक्षक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
10 वी परीक्षेसाठी एकूण 2,900 विद्यार्थी बसणार असून त्यामध्ये 2,124 मुले आणि 776 मुलींचा समावेश आहे. तर 12 वी परीक्षेसाठी 2,733 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 862, कला शाखेचे 1,376, वाणिज्य शाखेचे 409, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 85 आणि आयटीआयचा 1 विद्यार्थी समाविष्ट आहे.
मंडळाने जळगाव जिल्ह्यातील कोणतेही परीक्षा केंद्र “उपद्रवी” म्हणून घोषित केले नसल्याची माहितीही देण्यात आली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर