
सोलापूर, 10 जून (हिं.स.) : गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र निवडीस प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील सर्व आशा वर्कर, आरोग्य सेवक आणि सेविकांना कायद्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच पुढील जिल्हा दक्षता समिती बैठकीपूर्वी किमान एक डिकॉय केस आणि दोन स्टिंग ऑपरेशन यशस्वीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पीसीपीएनडीटी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले की, पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आरोग्य यंत्रणेचे काम समाधानकारक नसून सन 2025 मध्ये करण्यात आलेल्या चार डिकॉय केसेसपैकी एकही यशस्वी झाली नाही. हे आरोग्य यंत्रणेचे अपयश असल्याचे नमूद करत त्यांनी पुढील बैठकीपूर्वी परिस्थितीत शंभर टक्के सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत सध्या सुरू असलेल्या दहा प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच निकाली निघालेल्या 11 प्रकरणांचा सखोल अभ्यास करून ती पुन्हा प्रभावीपणे न्यायप्रक्रियेत आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजना सुचवाव्यात आणि त्याबाबतचा अहवाल पुढील बैठकीपूर्वी सादर करावा, असे निर्देश विधी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यांतर्गत 50 आरोपींविरुद्ध खटले सुरू आहेत. 24 डिसेंबर 2025 रोजी दाखल गुन्ह्यात 15 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 12 जणांना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच 7 जानेवारी 2026 रोजी बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनसह एका आरोपीला पकडण्यात आले.
सोलापूर ग्रामीण कार्यक्षेत्रात सध्या 243 सोनोग्राफी केंद्रे आणि 102 एमटीपी केंद्रे नोंदणीकृत आहेत. सर्व केंद्रांमध्ये ऑनलाइन ‘एफ फॉर्म’ प्रणाली सुरू असून नियमित त्रैमासिक तपासणी व ऑडिट केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
लिंग गुणोत्तरातही जिल्ह्यात सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे. 2017 मध्ये 885 असलेले लिंग गुणोत्तर 2024 मध्ये 931 पर्यंत पोहोचले आहे. जन्मावेळी लिंग गुणोत्तर 931 नोंदविण्यात आले असून पंढरपूर (946), करमाळा (943) आणि बार्शी (941) या तालुक्यांमध्ये विशेष सुधारणा दिसून आली आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत 0 ते 6 वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर 957 इतके नोंदविण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम तसेच एचआयव्ही आणि एड्स नियंत्रण कार्यक्रमाचाही आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड