२४ वर्षापूर्वी कुंभमेळ्यासाठी अधिग्रहित जागांचा लवकरच मोबदला
आमदार राहुल ढिकले - सिमा हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन नाशिक, 10 जून (हिं.स.)। वर्षभरावरून येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राम तसेच रिंग रोडच्या भूसंपादनास होणारा शेतक
Land acquired for Kumbh


आमदार राहुल ढिकले - सिमा हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

नाशिक, 10 जून (हिं.स.)।

वर्षभरावरून येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राम तसेच रिंग रोडच्या भूसंपादनास होणारा शेतकऱ्यांचा विरोध आता मावळण्याची चिन्ह असून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बहुतांश मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक सोडवण्याचे आश्वासन दिले. प्रामुख्याने २४ वर्षापूर्वी साधू ग्राम तसेच कुंभमेळ्याच्या रस्त्यांसाठी विना मोबदला अधिग्रहित केलेल्या जागांचा मोबदला देण्याबरोबरच मखमलाबाद येथील जिरायती क्षेत्राला बागायती क्षेत्राचा दर्जा देऊन त्यानुसार मोबदला देण्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आश्वस्त होत निर्विघ्नपणे कुंभमेळा पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देखील दिली.

गेल्या काही दिवसांपासून नासिक मध्ये कुंभमेळ्यासाठी जागा देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. नाशिक शहर व जिल्हा मधून ५६ किमी चा रिंग रोड जात असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जागेच्या मोबदल्यापासून तर अन्य अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन जरी शेतकऱ्यांची समजूत काढत असली तरी अनेक ठिकाणी वादावर तोडगा निघालेला नाही. हि बाब लक्षात घेता नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार ढिकले यांनी मखमलाबाद, आडगाव व नांदूर मानूर या भागामध्ये जागामालक शेतकऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त या दोघांकडे बैठक घेऊन स्थानिक पातळीवर जे प्रश्न सुटतील त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंगळवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमुख प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. सन २००२ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान, नांदूरनाका ते जत्रा हॉटेल लिंकरोड आणि छत्रपती संभाजीनगर महामार्ग रुंदीकरणासाठी स्वेच्छेने शेतकऱ्यांनी जागा दिली होती मात्र २५ वर्षे उलटूनही नाशिक महानगरपालिकेकडून संबंधित शेतकऱ्यांना केवळ 'आभारपत्रा'शिवाय कोणताही आर्थिक मोबदला किंवा जमीन मोबदला मिळालेला दिलेला नाही. मोबदला व्याजासह शेतकऱ्यांना त्वरित देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी मांडल्यावर तात्काळ मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले. मखमला बाद येथे बागायती असून अनेक ठिकाणी जिरायती नोंद करण्यात आली आहे. मागील १० वर्षांच्या कालावधीत संबंधित जमिनीवर कधीही बागायत पिकाची नोंद असल्यास, अथवा ते क्षेत्र जलसमृद्ध असल्यास, त्या जमिनीला 'कायमस्वरूपी बागायत' दर्जा देण्यात यावा यावरही सकारात्मक निर्देश दिले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे, स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, नगरसेवक रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, सुरेश खेताडे यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातील जागा मालक, शेतकरी उपस्थित होते.

साधू ग्रामच्या दरातील तफावत दूर होणार

नांदूर-दसक व नांदूर-मानूर परिसरात साधूग्राम साठी ना विकास क्षेत्र घोषित करण्यात आले असून येथील रेडी रेकनरचा दर कमी आहे. याच ठिकाणी रस्त्यालगत दुसरे क्षेत्र असून या ठिकाणी रेडी रेकनर चा दर जादा आहे. त्यामुळे दरातील तफावत दूर करण्याची मागणी करण्यात आली. सद्यस्थितीतील अधिग्रहणाबाबत प्रशासकीय अधिकारी व शेतकऱ्यांना मध्ये मागील ३ वर्षांतील उच्चतम खरेदी-विक्री व्यवहारांचे मध्यमान काढून किंवा शासकीय मूल्यदराच्या अडीच पट गुणाकार करून योग्य मोबदला देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्षात झोनिंग दाखल्याप्रमाणे प्रति चौ. मी. ₹५,७२०/-, ₹४,६७०/- आणि ₹३,९६०/- असे दर अधिकृत असताना, मूल्यनिर्धारण अधिकाऱ्यांनी केवळ ₹८४०/- प्रति चौ. मी. असा अन्यायकारक दर लावल्याची बाब ढिकले यांनी लक्षात आणून दिली. शासकीय दरापेक्षाही कमी दर दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असल्यामुळे नांदूर-दसक व आडगाव परिसरातील अधिग्रहित होणाऱ्या जमिनींचे शासकीय व चालू बाजारभावानुसार तातडीने फेरमूल्यांकन करण्याबाबत सूचना दिल्या जातील असेही स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande