येलदरीच्या स्थानिक मच्छिमारांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहीक आत्मदहनाचा प्रयत्न
परभणी, 10 जून (हिं.स.)। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात स्थानिक मच्छिमारांना ठेकेदार संस्थेकडून मासेमारीचे परवाने मिळावेत, ठेकेदार संस्थेच्या पदाधिकार्यांनी मच्छिमारांवर दाब दबाव, दडपण येईल, असे वर्तन करु नये यासह अन्य मागण्यांबाबत प्
येलदरी’च्या स्थानिक मच्छिमारांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहीक आत्मदहनाचा प्रयत्न


परभणी, 10 जून (हिं.स.)। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात स्थानिक मच्छिमारांना ठेकेदार संस्थेकडून मासेमारीचे परवाने मिळावेत, ठेकेदार संस्थेच्या पदाधिकार्यांनी मच्छिमारांवर दाब दबाव, दडपण येईल, असे वर्तन करु नये यासह अन्य मागण्यांबाबत प्रशासकीय स्तरावरुन शुध्द फसवणूक व कामगार कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याच्या निषेधार्थ सावंगी म्हाळसाच्या संतप्त स्थानिक मच्छिमारांनी बुधवार 10 जून रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर डिझेल ओतून सामुदायीकरीत्या आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस अधिकार्यांसह कर्मचार्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फोल ठरला.

सावंगी म्हाळसा येथील स्थानिक मच्छिमारांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक यांच्याकडे 27 मे रोजी सामुहीक आत्मदहनाबाबत निवेदन सादर केले होते. त्या निवेदनातून येलदरीच्या जलाशयावर ठेकेदार संस्थेकडून स्थानिक मच्छिमारांना तात्काळ मासेमारीचे परवाने मिळावेत, संस्था पदाधिकार्यांद्वारे होणारा दाब दबाव, दडपणाचे प्रकार तात्काळ थांबवावेत, मासेमारी परवाने रोखल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी प्रतिदिनी अडीचशे रुपये भरपाई द्यावी, तसेच मागासवर्गीय मच्छिमारांवर होणारा अन्याय दूर करावा यासह अन्य मागण्या नमूद केल्या होत्या. या स्थानिक मच्छिमारांच्या निवेदनावर 8 जून 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या कक्षात ठेकेदार संस्थेच्या सचिवासह स्थानिक मच्छिमारांची संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीतून काही विषयांच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. परंतु, काही मागण्यांबाबत या सरकारी यंत्रणेने वेळ मागून घेतला व सामुहीक आत्मदहनाचे आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली होती. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अधिकारी अजित सुरोसे यांनी या संदर्भात सावंगी म्हाळसाच्या स्थानिक मत्स्य व्यवसायिकांना पत्र सादर केले. परंतु, या स्थानिक मच्छिमारांनी प्रशासकीय स्तरावरुन सातत्याने आपली फसवणूक होत आहे, असा गंभीर आरोप करीत कामगार कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होऊन सुध्दा शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे न्याय मिळत नाही, असे नमूद करीत या अनास्थेविरुध्द सामुहीक आत्मदहन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शेकडो भूमीहीन, प्रकल्पग्रस्त, मागासवर्गीय मच्छीमार उद्वेगाने आणि प्रशासकीय छळास कंटाळून हे आंदोलन करीत आहेत, असे नमूद करीत बुधवारी सायंकाळी परभणीचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करीत यातील काही कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले व स्वतःस पेटविण्याचा प्रयत्न केला. त्याक्षणी पोलिस अधिकारी कर्मचार्यांनी आंदोलनकर्त्यांवर झडप मारुन आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, पोलिसांनी प्रविण मारोती जाधव, गौतम दशरथ गवळी, स्वप्नील वाटोळे, योगेश तारे आदी मच्छिमारांना ताब्यात घेतले असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, या आंदोलनाने काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाची स्थिती उद्भवली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande