
नंदुरबार,, 10 जून (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाने देशव्यापी स्तरावर मतदार याद्यांचे 'विशेष सखोल पुनरिक्षण' (Special
Intensive Revision - SIR) घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात
महाराष्ट्र राज्याचा समावेश करण्यात आला असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413
मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी
कल्पना ठुबे यांनी कळविली आहे.
20 वर्षांनंतर 'विशेष सखोल पुनरिक्षण'
देशात यापूर्वी 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि शेवटचे
2002-2004 या वर्षांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले होते. गेल्या 20 वर्षांत केवळ दरवर्षी
'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण' घेतले गेले, परंतु सखोल पुनरिक्षण झाले नव्हते. या 20 वर्षांच्या काळात
झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. अनेकांनी नवीन
ठिकाणी नावे नोंदवली, मात्र जुन्या ठिकाणची नावे वगळली नाहीत; ज्यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार
नावे वाढली आहेत. ही दोषनिवारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
एक लाखाहून अधिक 'बीएलओ' उतरणार मैदानात
राज्यातील संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी 1,00,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती
करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा
विचार करून निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी तिसऱ्या टप्प्याचे विशेष वेळापत्रक निश्चित केले आहे.
'असे' असेल पुनरीक्षणाचे सविस्तर वेळापत्रक:
निवडणूक आयोगाने जाहीर केलेले अधिकृत वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
20 ते 29 जून 2026: गणना अर्जांची छपाई आणि 'बीएलओ' (BLO) यांना प्रशिक्षण.
30 जून ते 29 जुलै 2026: 'बीएलओ' मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप
करतील व भरलेले अर्ज परत घेतील.
5 ऑगस्ट 2026: प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी.
5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026: प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदवणे.
3 ऑक्टोबर 2026 पर्यंत: प्राप्त दावे व हरकती निकालात काढणे.
7 ऑक्टोबर 2026: अंतिम मतदार याद्यांची अधिकृत प्रसिद्धी.
घरोघरी जाऊन होणार 'प्री-फिल्ड' प्रपत्रांचे वाटप
दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत 'बीएलओ' घरोघरी जाऊन (House to House visit)
मतदारांना 'प्री-फिल्ड' (आधीच माहिती भरलेले) गणना प्रपत्र वाटप करतील. यात मतदाराची सध्याची
माहिती असेल. तसेच संबंधित मतदाराची किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबांची 2002-2004
मधील जुन्या सखोल पुनरिक्षणातील माहिती आधीच भरलेली असेल किंवा मतदाराला ती स्वतः भरता
येईल. मतदारांना आपले नवीन छायाचित्र देण्याची सुविधाही असेल.
गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास 'बीएलओ' किमान 3 वेळा संबंधित घराला भेट देतील व त्याची नोंद
ठेवतील. मतदारांना हे प्रपत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकत्व पडताळणी आणि आधारचा वापर
संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असणे व
वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मतदार व्यक्ती भारतीय नागरिक आहे याची खातरजमा
करण्याची जबाबदारी आयोगाची आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 'आधार' हे ओळख
पुरावा म्हणून वापरले जाईल. तथापि, आधार ॲक्ट, 2026 च्या कलम 9 प्रमाणे आधारकार्ड हे
'नागरिकत्वाचा पुरावा' म्हणून मानले जाणार नाही.
त्रुटी असल्यास मिळतील नोटीस
ज्या मतदारांच्या नोंदी जुन्या मतदार यादीशी जुळणार नाहीत किंवा त्यात त्रुटी असतील, अशा व्यक्तींना
मतदान नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा पाठवल्या जातील. तसेच अशा नावांची यादी संभाव्य
कारणांसह स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय, तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी व मुख्य
निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. मतदारांना त्यांची 2002-2004 मधील
माहिती आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर राज्य, जिल्हा, विधानसभा
मतदारसंघ व नाव टाकून सहज मिळवता येईल.
राजकीय पक्षांना 'बीएलए' नेमण्याचे आवाहन
या मोहिमेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले 'मतदान केंद्रस्तरीय
प्रतिनिधी' (BLA) नियुक्त करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या राजकीय पक्षांनी फक्त 1,13,558 प्रतिनिधी
नेमले आहेत. मतदार यादीतून दुबार व मृत व्यक्तींची नावे काढण्यासाठी राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त
प्रतिनिधी नेमावेत, असे आवाहन करण्यात आले असून यासाठी लवकरच राजकीय पक्षांच्या
प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित केली जाणार आहे.
मतदार याद्या दोषविरहीत, अचूक व पारदर्शक करण्यासाठी आणि सर्व पात्र व्यक्तींचा समावेश
करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही
आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती ठुबे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर