
परभणी, 10 जून (हिं.स.)। सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या महासंघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस राज्यभरातील सुमारे 100 नगराध्यक्ष उपस्थित होते.
महासंघाने मिलिंद सावंत यांच्यावर छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा विभाग) तसेच उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी सोपविली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचे उल्लेखनीय कार्य, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील योगदान आणि प्रभावी नेतृत्वाची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, अध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे आणि संयोजक लक्ष्मणराव लटके यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
दरम्यान, राज्याच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, पाथरीचे नगराध्यक्ष आसेफ खान, सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर कदम, जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख तसेच मानवतचे नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्यासह विविध मान्यवरांनी सावंत यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis