
- हर्षजित देशमुख ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा; घोडेबाजारामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
अमरावती, 10 जून (हिं.स.)।
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे.माध्यमांशी बोलताना ठाकूर म्हणाल्या की, “अमरावतीचा उमेदवार मॅनेज झाल्यासारखा दिसत आहे. त्यांनी १५ ते २० कोटी रुपये घेतल्याची चर्चा सुरू आहे. आज आम्हाला माहिती मिळाली की ते एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आहेत आणि तेथूनच मुलाखती देत आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब आहे.यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त करत राज्य सरकारवरही प्रश्न उपस्थित केले. “जर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होत असेल आणि एवढी मोठी रोकड इकडून तिकडे जात असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत?” असा सवाल त्यांनी केला.यावेळी त्यांनी हेमंत पाटील यांच्या वक्तव्यालाही दुजोरा देत, “ही निवडणूक आता सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाही. संपूर्ण घोडेबाजार सुरू असून निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट होत आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असे सांगितले.
बिनविरोध निवडणूक झाल्यास नगरसेवकांचा मतदानाचा अधिकार हिरावला जाईल – निलेश विश्वकर्मा
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे विधान परिषद उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मी अद्याप यशोमती ठाकूर यांची क्लिप ऐकलेली नाही, मात्र त्यात तथ्य असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आहे, असे त्यांनी म्हटले. भाजप सत्तेच्या जोरावर निवडणुका लढवत असून नगरसेवकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक बिनविरोध झाल्यास नगरसेवकांचा मतदानाचा अधिकार हिरावला जाईल, असे सांगत नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून घोडेबाजार सुरू असल्याचा दावा विश्वकर्मा यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणीही त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी