हवामान तज्ञांच्या चुकीच्या अंदाजामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात
अमरावती, 10 जून (हिं.स.)। यावर्षी मृग बहराच्या नियोजनासाठी अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान तज्ञांनी व्यक्त केलेल्या लवकर पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आपल्या संत्रा बागांना ताण दिला. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने आता ताणावर सोडलेली संत्र
हवामान तज्ञांच्या चुकीच्या अंदाजामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात


अमरावती, 10 जून (हिं.स.)। यावर्षी मृग बहराच्या नियोजनासाठी अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान तज्ञांनी व्यक्त केलेल्या लवकर पावसाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आपल्या संत्रा बागांना ताण दिला. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने आता ताणावर सोडलेली संत्रा झाडे सुकण्याच्या मार्गावर असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

संत्रा उत्पादनात मृग बहराचे विशेष महत्त्व असते. बहर चांगला येण्यासाठी शेतकरी काही काळ झाडांना पाणी देणे बंद करून ताण देतात. त्यानंतर पावसाच्या आगमनानुसार सिंचन व व्यवस्थापनाचे नियोजन केले जाते. यंदा हवामान तज्ञांनी लवकर मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यानुसार निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात पावसाने दडी मारल्याने संत्रा बागांपुढे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे झाडांवरील ताण वाढत असून पाने गळणे, फांद्या वाळणे आणि बहरावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना आता पुन्हा सिंचनासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असून वीज, मजुरी आणि इंधन खर्चातही वाढ झाली आहे.

शेतकरी सांगतात की, हवामान अंदाजाच्या आधारे घेतलेले निर्णय चुकीचे ठरल्याने संत्रा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हवामान अंदाज देताना स्थानिक परिस्थिती आणि संभाव्य बदल याबाबत अधिक अचूक माहिती देणे आवश्यक आहे. चुकीच्या अंदाजाचा सर्वाधिक फटका फळबाग उत्पादकांना बसत असून त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन यंत्रणा उभी करून कृषी विभागाने संत्रा बागा वाचविण्यासाठी तातडीने मार्गदर्शन करावे अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांनी केली आहे. हवामान तज्ञांच्या अंदाजावर विश्वास ठेवून मृग बहराचे नियोजन केले, पण पावसाने पाठ फिरवल्याने आता संत्रा बागा वाचविण्याचे मोठे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे, अशी खंत संत्रा उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande