खा. प्रणिती शिंदे यांचा जनतेशी थेट संवाद; वादळग्रस्त शेतीची पाहणी, सिंचन व रस्ते प्रश्नांवर पाठपुराव्याची ग्वाही
सोलापूर, 10 जून (हिं.स.)। : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावाला भेट देत वादळी वारा व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्
Nzkd


सोलापूर, 10 जून (हिं.स.)।

: सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावाला भेट देत वादळी वारा व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध प्रश्न जाणून घेत संबंधित विषयांवर शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

रड्डे येथील शेतकरी दादासो कृष्णदेव थोरबोले यांच्या दोन एकर क्षेत्रातील कारल्याचा प्लॉट वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही त्यांच्या दोडका पिकाचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. दोन्ही नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली. यावेळी खासदारांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही माहिती घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत व भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी रड्डे परिसरातील शेतकऱ्यांनी २४ गाव उपसा सिंचन योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करत खासदार शिंदे यांना निवेदन दिले. तसेच शिरनांदगी येथून रड्डे वितरिकेत शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली. यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन २४ गाव उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

दौऱ्यादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी सुरेश तात्या कोळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांचे सुपुत्र राज्य सचिव रवीकिरण कोळेकर व विजय कोळेकर उपस्थित होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी सुरेश कोळेकर यांना तब्येतीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला.

तसेच पंचायत समिती सदस्य सुरेश ईश्वर कांबळे यांनी रड्डे पंचायत गणातील गावांना जोडणारे व परिसरातील महत्त्वाचे रस्ते मंजूर करण्याबाबतचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांना दिले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी हे रस्ते अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या मागणीबाबतही संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande