
सोलापूर, 10 जून, (हिं.स.) - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांच्या निवासस्थानी महायुतीची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी तसेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळविण्याच्या दृष्टीने यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान आवताडे, महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, चेतनसिंह केदार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निवडणुकीचे नियोजन, मतदारांशी संपर्क, प्रचार यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच महायुतीतील समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांपर्यंत पोहोचून महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची ताकद दाखवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे, असा संदेशही यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड