
छत्रपती संभाजीनगर, 10 जून (हिं.स.)गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारात मुरुमाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाने गणेशवाडी ३३ केव्ही उपकेंद्रातून जाणाऱ्या वीज वाहिनीच्या खांबाला जोरदार धडक दिली. यामुळे दोन वीज खांब कोसळले. परिणामी तारांचा ताण वाढून आणखी सात खांबांवरील वीजवाहिन्या तुटून खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत एकूण आठ खांबांचे नुकसान झाले असून परिसरातील १५ हून अधिक गावांचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित झाला होता.
या घटनेमुळे गणेशवाडी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या कायगाव, अमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, अगरवाडगाव, भिवधानोरा, धनगरपट्टी, ढोरेगाव, पिंपळवाडी, सय्यदपूर आदी गावांसह परिसरातील अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वीजपुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा, शेतीपंप, लघुउद्योग आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी नुकसानग्रस्त खांब उभारणे व तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्नशील होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis