पोलिसांचे नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन
लातूर, 10 जून (हिं.स.)। एका क्षणाची निष्काळजीपणा, हेल्मेट न घालण्याचा एक निर्णय आणि एका कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला. लातूर शहरात घडलेल्या आणखीन एका भीषण रस्ते अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन व हेल्मेटचे महत्त्व अधो
पोलीस आवाहन


लातूर, 10 जून (हिं.स.)।

एका क्षणाची निष्काळजीपणा, हेल्मेट न घालण्याचा एक निर्णय आणि एका कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला. लातूर शहरात घडलेल्या आणखीन एका भीषण रस्ते अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन व हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

दि. ७ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास असिफ उर्फ अरबाज मुस्ताक शेख (वय २४ वर्षे, रा. जिनत सोसायटी, लातूर) हे त्यांच्या दुचाकीवरून औषधे घेण्यासाठी जात असताना सम्राट चौक ते गुळ मार्केट मार्गावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर समोरून येणाऱ्या ऑटोमुळे त्याच्या मोटर सायकलचा बॅलेन्स बिघडून नर्मदा ट्रॅव्हल्स (MH-24 BW-0001) च्या मागच्या टायर खाली आल्याने अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस ठाणे गांधी चौक येथे या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) व 281 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.मात्र या दुर्दैवी घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे अपघातग्रस्त तरुणाने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. अपघाताचा आघात थेट डोक्यावर झाल्यामुळे त्याचा जीव वाचविणे शक्य झाले नाही. अनेक अपघातांमध्ये हेल्मेट हे मृत्यू आणि जीवन यामधील सर्वात महत्त्वाचे संरक्षण कवच ठरते.

दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये अनेक तरुणांचा मृत्यू होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात डोक्याला झालेल्या दुखापती कारणीभूत असतात. विशेष म्हणजे यातील अनेक मृत्यू केवळ हेल्मेटचा वापर केला असता टाळता आले असते. अपघाताची तीव्रता कमी करणे आणि मेंदूचे संरक्षण करणे हे हेल्मेटचे सर्वात मोठे कार्य आहे.

लातूर पोलीस दल वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी सातत्याने जनजागृती, विशेष मोहिमा, समुपदेशन आणि दंडात्मक कारवाई करीत आहे. मात्र प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखणे तितकेच आवश्यक आहे.

आज एका कुटुंबाने आपला मुलगा, भाऊ आणि आधार गमावला आहे. ही वेदना कोणत्याही दंडापेक्षा मोठी आहे. म्हणूनच लातूर पोलिसांचे सर्व नागरिकांना कळकळीचे आवाहन आहे की, दुचाकी चालविताना आणि मागे बसताना नेहमी दर्जेदार हेल्मेटचा वापर करा. वाहतूक नियमांचे पालन करा. वेगावर नियंत्रण ठेवा. कारण अपघातानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा अपघात टाळणे अधिक महत्त्वाचे आहे.

हेल्मेट घाला... कारण घरी कोणीतरी तुमची सुरक्षित परत येण्याची वाट पाहत आहे.

दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीव वाचवण्यासाठी हेल्मेट वापरा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande