
रत्नागिरी, 9 जून (हिं.स.) । हातखंब्यातील योगायोग मित्र मंडळाने आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या मेहेंदी प्रशिक्षण शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात महिलांच्या संरक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पस्तीस वर्षांच्या सामाजिक कार्याच्या चळवळीत ग्रामीण भागातील महिला व युवतींना केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून योगायोग मित्रमंडळाने पाच दिवसांचे व्यावसायिक मेहेंदी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. हजारो रुपये शुल्क असलेल्या या कोर्सचे प्रशिक्षण मंडळाने अवघ्या ५० रुपयांच्या नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिल्यामुळे हातखंबा पंचक्रोशीतीलच नव्हे तर कशेळी, दाभोळे येथील तब्बल ६७ महिला व युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन स्टेट बँकेच्या हातखंबा शाखा व्यवस्थापक शीतल शिंदे यांच्या हस्ते झाला. या संपूर्ण ५ दिवसीय उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री होते. व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्या श्रीमती रत्नप्रभा देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती ऐश्वर्या देसाई, शिबिरातील टी-ब्रेकचे प्रायोजक सोसायटी टीचे मंगेश मसूरकर, श्री. आठवले, तसेच मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती संपदाताई देवळेकर उपस्थित होत्या.
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील सुवर्णपदक विजेत्या मुख्य प्रशिक्षिका अनुष्का प्रशांत महाजन यांनी अत्यंत सोप्या पद्धतीत महिलांना मेहेंदी व्यवसायाचे सर्व तांत्रिक बारकावे शिकवले. प्रशिक्षणादरम्यान लागणारे सर्व साहित्य मंडळाने मोफत पुरवले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थी महिलांची अटीतटीची मेहेंदी स्पर्धा झाली.
यामध्ये महिलांनी एकापेक्षा एक सुंदर डिझाइन्स रेखाटून सर्वांचे डोळे दिपवले. स्पर्धेमध्ये शमिका राजेश झगडे,
मनाली नारायण केसरेकर, मैत्री महेंद्र कांबळे आणि केतकी लक्ष्मीकांत केतकर यांनी पहिले चार क्रमांक पटकावले. मुख्य प्रशिक्षिका अनुष्का महाजन यांनी सर्व प्रशिक्षणार्थींच्या कलेचे कौतुक करत शिबिराबद्दल गौरवोद्गार काढले. विजेत्यांना मंडळातर्फे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आणि सर्व सहभागींना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सांगता समारंभाला मुख्य अतिथी म्हणून हेडकॉन्स्टेबल सानिया कांबळे उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित महिला व युवतींना महिला सुरक्षितता, सायबर सुरक्षा आणि कायदे या विषयावर अत्यंत प्रभावी व्याख्यान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी