
सांगली, 10 जून (हिं.स.) - महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली. अपघात इतका भयंकर होता की सिकंदरच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर आपल्या प्रवासानिमित्त सांगोला-मिरज मार्गावरून जात असताना हा अपघात घडला. रस्ता आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, कारचे समोरचे आणि बाजूचे भाग पूर्णपणे चक्काचूर झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, सिंकदर आपल्या वाहनाने रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना विठ्ठलवाडीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. त्यानंतर भरधाव वेगातील गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर जाऊन जोरात आदळली. धडक इतकी तीव्र होती की वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हेतर देशभरातील प्रसिद्ध मल्लांना आस्मान दाखवत सिकंदर शेखने कुस्तीच्या मैदानात आपला दबदबा निर्माण केला आहे. सिकंदरने महाराष्ट्र केसरीसह अनेक मानाच्या स्पर्धा जिंकत कुस्ती क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी