सोलापूर - वंदना गायकवाड यांनी मांडल्या कस्तुरबा उद्यानातील समस्या; आयुक्तांकडून कारवाईचे आदेश
सोलापूर, 10 जून (हिं.स.)। शहरातील सार्वजनिक सुविधा, उद्याने आणि भाजी मंडई परिसरातील वाढत्या समस्यांची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी न्यू बुधवार पेठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. कस्तुरबा उद्यान आणि कस्तुरबा भाजी
Djvg


सोलापूर, 10 जून (हिं.स.)। शहरातील सार्वजनिक सुविधा, उद्याने आणि भाजी मंडई परिसरातील वाढत्या समस्यांची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी न्यू बुधवार पेठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. कस्तुरबा उद्यान आणि कस्तुरबा भाजी मार्केटमधील अस्वच्छता, बंद अवस्थेतील सुविधा आणि धोकादायक झाडांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींनंतर आयुक्तांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

कस्तुरबा उद्यान सध्या बंद अवस्थेत असल्याने येथे समाजकंटकांकडून गैरप्रकार घडत असल्याची बाब नगरसेविका श्रीमती वंदना गायकवाड यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर आयुक्तांनी उद्यान विभागाला तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून वाढलेली झुडपे व अनावश्यक झाडे हटवण्याचे निर्देश दिले.

यावेळी स्थानिक नागरिकांकडून उद्यानात वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम आणि चिल्ड्रेन पार्क विकसित करण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने विकासकामे करण्यात येतील, असे स्पष्ट केले. तसेच नगरसेवकांनी आपल्या स्थानिक निधीतून सहकार्य केल्यास कामांना अधिक गती मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कस्तुरबा भाजी मार्केटमधील बंद अवस्थेतील स्त्री-पुरुष शौचालयांमुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागाला शौचालयांची तातडीने दुरुस्ती करून ती सुरू करण्याचे आदेश दिले.

भाजी मंडईतील जुन्या इमारतीवर वाढलेली झाडे आणि गळणारे पत्रे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. अधिकारवर्गाच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होताच आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्यान विभागाला तातडीने धोकादायक झाडे हटवून परिसर सुरक्षित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात नगरसेविका श्रीमती वंदना गायकवाड, अजित गायकवाड, नगर अभियंता प्रमुख श्रीमती सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी श्रीमती सुनीता हिबारे, उद्यान प्रमुख कु. कोमल काशीद, आरोग्य निरीक्षक श्री. खाजाप्पा कट्टीमनी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. जोशी बुवा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका प्रशासनाने शहरातील उद्याने आणि भाजी मंडई परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुसज्ज करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून आगामी काळात सार्वजनिक सुविधांच्या दर्जात्मक वाढीस प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande