
अविनाश जाधवांकडून परप्रांतीय चालकांना इशारा
ठाणे, 10 जून (हिं.स.)। ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ एका वृद्धाला झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक झाली आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या एका परप्रांतीय वाहनचालकाला जाब विचारल्याच्या कारणावरून वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह व्हिवियाना मॉल परिसरात जाऊन काही मुजोर वाहनचालकांना धडा शिकवल्याचे समोर आले आहे. तसेच वृद्धावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर भारतीय न्याय संहितेतील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक वृद्ध दाम्पत्य पायी जात असताना एका परप्रांतीय वाहनचालकाने रस्त्यावर थुंकले. याबाबत संबंधित वृद्धाने विचारणा केल्यानंतर वाहनचालक संतापला आणि त्याने वृद्धावर हल्ला केला. आरोपीने हातातील दगडानेही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी परिसरातील अनेक लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडले, मारहाण केली आणि वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर अविनाश जाधव यांनी व्हिवियाना मॉल परिसरात भेट देत तेथील काही वाहनचालकांची चौकशी केली. चौकशीदरम्यान उद्धटपणे वागणाऱ्या चालकांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यावेळी जाधव यांनी परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, मात्र स्थानिकांशी दादागिरी करू नये, असा इशारा दिला. वृद्धावर झालेल्या हल्ल्यासारख्या घटना पुन्हा घडल्यास कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वाढत असतील तर ते चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule