
रत्नागिरी, 10 जून (हिं.स.) । खेड शहराजवळील जगबुडी नदीत बुडालेले तिघेजण मुंबईचे रहिवासी असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.या दुर्घटनेत एका तरुणाला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्याच्याकडून ही माहिती मिळाली.आकाश, नरेश आणि कैलास कांबळे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही मूळचे सांगली जिल्ह्यातील असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीसाठी ते खेड येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते.
बुधवारी दुपारी हे चौघेजण जगबुडी नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र नदीतील पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात अडकले. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले.
स्थानिकांच्या प्रयत्नांमुळे एका तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास यांना वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या तिघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी