
नाशिक, 10 जून (हिं.स.)।
- विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. पण ते निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
गोकुळ गिते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण मुख्यमंत्री दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गोकुळ गिते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नाशिक विधानपरिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमदेवार आहेत. ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली आहे.
गोकुळ गिते यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काल मी प्रचारात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या भावाला फोन आला होता. मला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवले होते. आज ते दिल्लीला आहेत. मात्र मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीला जायला सांगितले, तर तिथे जाणे क्रमप्राप्त आहे. नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे गणेश गितेंच्या घरी गेले होते. मी त्यांची भेट नाकारली. ते गणेश दादा आणि वहिनीला भेटले. आधी बोलायचे आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही काही संस्कृती नाही. कुणाल दराडेचे वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यांनी माझा बाप काढला.दराडे यांना जिंकून आण्यासाठी त्यांना पाठिंबा हवा आहे. गेल्या ८ दिवसांपासून मला प्रलोभन येत आहेत. पण मला ते नको आहे, भीक घेणार नाही. मध्यस्थी मार्फत प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा गोकुळ गिते यांनी केला. माझ्याकडे भाजपचे कुठलही पद नाही. गणेश भाऊ २०१७पासून भाजपचे पदाधिकारी आहेत. स्थायी समिती सदस्य होते. मी पडद्यामागे राहून काम करायचो. माझ्या कामांमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा झाला, असे गोकुळ गिते यांनी सांगितले.
दराडे यांच्या विरोधात मतदार आहेत. मागच्या सहा वर्षात दराडे यांनी कुठलेही काम केले नाही. आजच्या भेटीत देखील काही मार्ग निघेल, असे वाटत नाही. मी तडजोड करणार नाही. इथले जे आमदार आहेत ते निष्क्रिय आहेत असे मतदारांचे म्हणणे असल्याचे गोकुळ गिते म्हणाले. त्यामुळे मतदार मला लढण्यासाठी सांगत आहेत. नेत्यांचा मान राखण्यासाठी मी थांबू शकतो, घरात बसू शकतो पण पाठिंबा देऊ शकत नाही, असे गोकुळ गिते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV