
* पारदर्शक पंचनामे पूर्ण करावेत व हेक्टरी २ लाख रुपये नुकसान भरपाई त्वरित द्यावी
मुंबई, 10 जून (हिं.स.) - शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत व शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
जयंतराव पाटील यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारासह अनेक भागांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात हजारो हेक्टरवरील केळी बागा उद्ध्वस्त झाल्या असून लाखो रुपयांची गुंतवणूक एका रात्रीत मातीमोल झाली आहे. केळी हे नगदी पीक आहे व रोपे, खते, औषधे, मजुरी, सिंचन आणि वाहतूक यासाठी हेक्टरी जवळपास ३ लाख रुपये व एकरी १ लाख रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीत वादळी वाऱ्यामुळे व गारपीटामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत व शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पारदर्शक पंचनामे पूर्ण करावेत व हेक्टरी २ लाख रुपये नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांना द्यावी असंही ते म्हणाले.
तसेच बँक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन व्याजमाफीचा विचार करावा व विमा कम्पन्यांना लगेच विमा अदा करण्याचे निर्देश देण्यात यावे. सध्या मदत करण्याचे निकष शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 द्वारे विहित करण्यात आले असून ते सन 2025 -26 पर्यंत लागू होते, सध्या त्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की, सदर निकष तात्काळ सुधारित करून शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात यावी असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी