
मुंबई, 10 जून (हिं.स.)। राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने आणि काटेकोरपणे पूर्ण करावेत. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीमान करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या फळपीक नुकसानीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री भरणे बोलत होते. पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (व्ही.सी.व्दारे), आमदार चंद्रकात पाटील, आमदार अमोल जावळे, कृषि विभागाचे सचिव परिमल सिंह (व्ही.सी.व्दारे), कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक (विस्तार) रफीक नाईकवडी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे मुख्य प्रबंधक अजित कुमार, उपव्यवस्थापक अतुल झनकर आदी बैठकीस उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की, मे आणि जून २०२६ या कालावधीत राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये एकूण ६१ हजार ४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी १८ हजार १२१ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. विशेषतः ६ जून रोजी झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे अचूक मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
जळगाव, बुलडाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात फळपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. जळगाव जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात मिळून 7 हजार 594 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी 7 हजार 216 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि महसूल विभागामार्फत वेगाने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. भारतीय कृषी विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण सुरू असून सर्व पंचनामे पुढील दहा दिवसांत पूर्ण करावेत, असे निर्देशही मंत्री भरणे यांनी दिले.
विमाधारक आणि विमाविहीन शेतकऱ्यांचे नुकसानही अचूक नोंदविण्यात यावे. आवश्यकतेनुसार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण पूर्ण करावे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत वेळेत मिळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. महसूल विभागाची मदत घेऊन बाधित शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. सध्या अनेक शेतकरी अडचणीत असून त्यांना त्वरित मदत मिळणे गरजेचे असल्याचे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राज्यातील बाधित क्षेत्र, पंचनामा स्थिती, केळी पिकावरील परिणाम तसेच पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर