
पाटणा, 12 जून (हिं.स.)। पाटणा येथे प्रशिक्षण पूर्ण करून परतत असलेल्या मधेपुरा जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांचा बेगुसराय जिल्ह्यातील साहेबपूर कमाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला.
मृतांमध्ये उदाकिशुनगंज उपविभागातील रतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन कुमार, अरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरेंद्र ज्ञानेंद्र तसेच मधेपुरा उपविभागातील बेलारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज कुमार यांचा समावेश आहे. या अपघातात वाहनचालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० आणि ११ जून रोजी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी हे तिन्ही पोलीस निरीक्षक गाडीने मधेपुराकडे परतण्यासाठी रवाना झाले होते. खासगी चालक ज्योतिष कुमार हा गाडी चालवत होता. रात्री एक वाजण्याच्या सुमारास बेगुसराय जिल्ह्यातील साहेबपूर कमलजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला त्यांच्या गाडीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात तिन्ही पोलीस निरीक्षकांचा आणि गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेगुसरायचे पोलीस अधीक्षक मनीष कुमार घटनास्थळी दाखल झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule