अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार केला - मुख्यमंत्री
मुंबई, 12 जून (हिं.स.) - अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात करता येतील, हाही आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धर
मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई, 12 जून (हिं.स.) - अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात करता येतील, हाही आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणे कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटे साठेच कामी येतात. त्यामुळे त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, मी माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात वाच्यता केली होती. त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन ही जलसंधारणाची कामे कशी पूर्ण करायची, हे आपण सांगितले आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने आपण पशु संवर्धन विभाग आणि कृषि विभाग यांना सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. ही गोष्ट खरी आहे की, ज्या पद्धतीचे अंदाज दिले जात आहेत, त्यात अडचण मोठी असेल; पाऊस कमी पडणार आहे. त्यातून आपण मार्ग काढू. विशेषतः शेतकऱ्यांना आम्ही सल्ला देत आहोत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसारच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली, तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील. दुबार पेरणीची वेळ येईल, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande