कोल्हापूर - जिल्ह्यात अवैध गावठी दारूविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
, 12 जून (हिं.स.)। कोल्हापूर जिल्ह्यात 29 मे ते 10 जून 2026 या कालावधीत जिल्ह्यात अवैध दारूविरोधात एकूण 208 गुन्हे दाखल करण्यात आले असून 200 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 3 हजार 948 लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली, तर गावठी दारू नि
कोल्हापूर - जिल्ह्यात अवैध गावठी दारूविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई


, 12 जून (हिं.स.)। कोल्हापूर जिल्ह्यात 29 मे ते 10 जून 2026 या कालावधीत जिल्ह्यात अवैध दारूविरोधात एकूण 208 गुन्हे दाखल करण्यात आले असून 200 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 3 हजार 948 लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली, तर गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे 53 हजार 480 लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले. याशिवाय सुमारे 300 लिटर इतर द्रव पदार्थ तसेच 400 किलो अखाद्य गूळ जप्त करण्यात आला आहे. या सर्व कारवाईत एकूण 55 लाख 45 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे जिल्ह्यात मिथेनॉल मिश्रित गावठी दारूच्या सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता), तसेच विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष कारवाई करण्यात आली.

हातभट्टी दारू निर्मिती समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागांना विशेष सूचना दिल्या आहेत. हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या व्यक्तींनाही आरोपी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 93 अन्वये सराईत गुन्हेगारांविरुद्ध चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे 67 प्रस्ताव दाखल करण्यात आले असून 7 प्रकरणांमध्ये 7 लाख इतक्या रुपयांची बंधपत्रे घेण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी यांनी महावितरणला अवैधरित्या वीज चोरी करून हातभट्टी दारू निर्मिती होत असल्याचे आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच माणगाववाडी, मोरेवाडी आणि दानोळी परिसरात वनक्षेत्रातील लाकडाचा बेकायदेशीर वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागालाही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि कोतवाल यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित जागामालक आणि कच्चा माल पुरवठादारांची माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात मिथेनॉल या रसायनाचा वापर, उत्पादन, खरेदी, विक्री आणि साठवणूक याबाबत माहिती संकलित करून सखोल तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनालाही पत्राद्वारे सूचना करण्यात आल्या आहेत. अवैध गावठी दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अखाद्य अथवा खाद्य गुळाच्या पुरवठादारांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 168 अन्वये बेकायदेशीर दारू उत्पादकांना कच्चा माल पुरविणाऱ्या व्यक्तींनाही संबंधित गुन्ह्यात दोषी धरले जाईल.

जनसहभागातून अवैध मद्यनिर्मितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 134 (अ) अंतर्गत ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. रसायनयुक्त विषारी दारूमुळे दृष्टी जाणे, अवयव निकामी होणे तसेच अकाली मृत्यू होण्याचा गंभीर धोका असल्याने याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश महाविद्यालये, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग तसेच प्रसारमाध्यमांना देण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा बेकायदेशीर धंद्यांबाबत माहिती असल्यास अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 88888 12345 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande