शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक, सरसंघचालकांच्या बोगीचे काच तुटले
उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद येथील घटना, डॉ. भागवत सुरक्षित फिरोजाबाद,12 जून (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. कानपूर
दगडफेकीत शताब्दी एक्स्प्रेसच्या खिडकीची तुटलेली काच


उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद येथील घटना, डॉ. भागवत सुरक्षित

फिरोजाबाद,12 जून (हिं.स.) : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. कानपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर मोहन भागवत 12003 लखनऊ-नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेसने दिल्लीकडे जात होते. याच दरम्यान फिरोजाबादजवळ त्यांच्या डब्यावर दगड फेकण्यात आला.

यासंदर्भात उत्तर-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, मोहन भागवत ई-1 डब्यातील 39 आणि 40 क्रमांकाच्या आसनांवर प्रवास करत होते. फेकलेला दगड 50 क्रमांकाच्या आसनाजवळील खिडकीवर आदळला. दगड बाहेरील काचेवर लागल्याने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवून रेल्वेला दिल्लीकडे रवाना करण्यात आले. लखनऊहून दिल्लीकडे जाणाऱ्या हायस्पीड शताब्दी एक्सप्रेसवर गुरुवारी संध्याकाळी मख्खनपूर आणि फिरोजाबाद रेल्वे स्थानकांदरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. याच गाडीत आरएसएस प्रमुख मोहन भागवत प्रवास करत होते. मात्र, या घटनेत ते पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना किंवा इतर कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

मोहन भागवत हे शताब्दी एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधील ई-1 डब्यात प्रवास करत होते. गाडी मख्खनपूर-फिरोजाबाद दरम्यान पोहोचताच अचानक त्यांच्या डब्याला लक्ष्य करून दगडफेक करण्यात आली. दगड थेट त्याच डब्यावर आदळला ज्यामध्ये ते उपस्थित होते. या दगडफेकीमुळे खिडकीची एक काच फुटली. सुदैवाने मोहन भागवत दुसऱ्या बाजूला बसलेले असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने गाडीला मधल्या मार्गात कुठेही थांबविण्यात आले नाही. ती थेट पुढे रवाना करण्यात आली. घटनेची माहिती तात्काळ टूंडला जंक्शनला देण्यात आली. तेथे रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) यांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या सुरक्षा ताफ्यासह तैनात झाले.

शताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी 7:34 वाजता टूंडला जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचताच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. कडक सुरक्षा प्रोटोकॉल आणि स्थानकावरील गर्दी लक्षात घेऊन मोहन भागवत यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले नाही. सुरक्षा अधिकारी आणि रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी डब्यात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.मोहन भागवत पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 7:41 वाजता शताब्दी एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आली. दरम्यान, आरपीएफ आणि जीआरपी यांच्या संयुक्त पथकांनी मख्खनपूर-फिरोजाबाद रेल्वे मार्गालगतच्या परिसरात तपास मोहीम सुरू केली आहे.000000000000000000000

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande