
पुणे, 12 जून (हिं.स.)।
राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांच्या उत्पादनास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात एकूण ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे जिल्हानिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे लसमात्रांचे उत्पादन करण्यात आले असून, लसींची शीत साखळी अबाधित ठेवून त्या वेळेत क्षेत्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्याबरोबरच लसीकरणाचा दैनंदिन अहवाल नियमित सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला होता, त्या हॉटस्पॉट भागांमध्ये प्राधान्याने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक आणि सेवादाते यांच्या सक्रिय सहभागाचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
लंपी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून आपल्या राज्यातील गोधनाची सुरक्ष करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या शेतकरी बांधवांचा मुख्य कणा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. सद्यस्थितीत हा उपाय खेत्रीय स्तरावर आम्ही मोहिम स्वरुपात योजत आहोत. पशुपालांनीही विभागास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु