
पुणे, 12 जून (हिं.स.)।
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि अलार्ड युनिव्हर्सिटी, हिंजेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता अलार्ड युनिव्हर्सिटी, राजीव गांधी आयटी पार्क, हिंजेवाडी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील १४ नामांकित उद्योजक सहभागी होणार असून, ६९२ हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. टेक्निकल मॅनेजर, आर्किटेक्ट, सॉफ्टवेअर इंजिनिअर, वेब डेव्हलपर, आयटी डेव्हलपमेंट, बीपीओ (व्हॉइस/नॉन-व्हॉइस), मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअर, क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर, क्वालिटी इन्स्पेक्टर तसेच पदवीधर व डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांच्या माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. तसेच दि. १६ जून रोजी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व बायोडाटा सोबत घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु