भुसावळ–दादर एक्स्प्रेस २१ डब्यांसह धावणार
जळगाव, 12 जून (हिं.स.) रेल्वे प्रशासनाने भुसावळ–दादर मार्गावरील विशेष आणि नियमित एक्स्प्रेस गाड्यांच्या संरचनेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असून त्यामुळे वातानुकूलित, शय
भुसावळ–दादर एक्स्प्रेस २१ डब्यांसह धावणार


जळगाव, 12 जून (हिं.स.) रेल्वे प्रशासनाने भुसावळ–दादर मार्गावरील विशेष आणि नियमित एक्स्प्रेस गाड्यांच्या संरचनेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असून त्यामुळे वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य श्रेणीतील प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०४९ दादर–भुसावळ विशेष आणि ०९०५० भुसावळ–दादर विशेष या गाड्यांमध्ये आजपासून म्हणजे १२ जूनपासून, तर ०९०५१ दादर–भुसावळ विशेष आणि ०९०५२ भुसावळ–दादर विशेष या गाड्यांमध्ये उद्या १३ जूनपासून सुधारित रचना लागू करण्यात आली आहे. तसेच १९००३ दादर–भुसावळ आणि १९००४ भुसावळ–दादर एक्स्प्रेस या नियमित गाड्यांमध्ये १६ जूनपासून वाढीव डब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन संरचनेनुसार गाड्यांमध्ये आता १९ ऐवजी २१ डबे असतील. त्यामध्ये एक वातानुकूलित प्रथम-द्वितीय श्रेणी डबा, एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, चार वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, नऊ शयनयान डबे, चार सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि दोन सामान व गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे.

भुसावळ–दादर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार तसेच परिसरातील लाखो नागरिकांसाठी मुंबईशी जोडणारा मुख्य दुवा आहेत. रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि विशेषतः मुंबईतील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशांची या मार्गावर वर्षभर मोठी गर्दी असते. उन्हाळी सुट्ट्या आणि सण-उत्सवांच्या काळात तर आरक्षण मिळणे अशक्य व्हायचे. या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीला अखेर रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे वाढीव वातानुकूलित आणि शयनयान डब्यांमुळे आरक्षणासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande