
सोलापूर, 12 जून, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजीत पवार यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करत त्यांनी महावितरणसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठामपणे मांडल्या.महावितरणच्या सोलापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन उत्तर सोलापूर तालुक्यातील वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी, रखडलेली विकासकामे, कृषी वीज जोडण्या तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची समस्या, नवीन कृषी वीज जोडण्यांचा प्रश्न आणि रखडलेल्या वीज पायाभूत सुविधांच्या कामांबाबत इंद्रजीत पवार यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना वेळेत आणि सुरळीत वीजपुरवठा मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही विविध प्रश्नांबाबत माहिती देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर पुढेही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे इंद्रजीत पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरण प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड