
सोलापूर, 12 जून, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाणार असून, मतदारांना मतदानासाठी जांभळ्या रंगाचा स्केचपेन उपलब्ध करून दिला जाणार आहे.निवडणुकीत मतदारांना उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी मतदान कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा प्राथमिक टप्पा पार पडल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर, विविध तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया नियमांनुसार आणि कोणत्याही वादविवादाशिवाय पार पडावी, यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून मतदान केंद्रांवरील व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड