
अमरावती, 12 जून (हिं.स.)। राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभारात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर तुकाराम मुंढे यांच्याकडून भर दिला जात असला, तरी अमरावती विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे अन्न भेसळ, औषध तपासणी आणि अंमलबजावणीच्या कामावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कारवाई करणार कोण आणि भेसळ तपासणार कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती विभागात औषध निरीक्षकांची तब्बल ११ पदे रिक्त असून, सहायक आयुक्तांची ३ पदेही रिक्त आहेत. या पदांवर नियुक्त्या न झाल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थामध्ये होणारी भेसळ, औषध विक्रीतील अनियमितता, तसेच विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची बाब समोर येत आहे. अन्न भेसळ रोखण्यासाठी नियमित नमुना संकलन, तपासणी, छापे आणि न्यायालयीन कार्यवाही आवश्यक असते. मात्र, रिक्त पदांमुळे या कारवायांचा वेग मंदावल्याची चर्चा विभागात आहे.
एकाच अधिकाऱ्याला अनेक जिल्ह्यांचा कारभार सांभाळावा लागत असल्याने तपासणी मोहिमा, नमुना संकलन आणि कारवाईच्या प्रक्रियेवर मर्यादा येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असणे चिंतेची बाब मानली जात आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रभावी कारवाईसाठी सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रशासनाची कार्यक्षमता मर्यादित होत असल्याचे चित्र आहे.
औषधी प्रशासनातील अमरावती विभागातील पदांची माहिती
पदाचे नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
सह आयुक्त ०१ ० ०१
सहायक आयुक्त ०५ ०२ ०३
औषधी निरीक्षक १२ ०१ ११
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी