सोलापूर जिल्हा दूध संघ एनडीडीबीकडे?; दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
सोलापूर, 12 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) कडे हस्तांतरण करण्याच्या हालचालींना वेग आला असून, हा प्रस्ताव मार्गी लागल्यास जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरण
Milk


सोलापूर, 12 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) कडे हस्तांतरण करण्याच्या हालचालींना वेग आला असून, हा प्रस्ताव मार्गी लागल्यास जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे खासगी दूध संस्थांच्या वाढत्या वर्चस्वाला आळा बसून दूध उत्पादकांना अधिक स्पर्धात्मक दर मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.एकेकाळी सोलापूर जिल्हा दूध संघ हा जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाचा कणा मानला जात होता. त्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता आणि खासगी संस्थांनाही दूध संघाशी स्पर्धा करण्यासाठी योग्य भाव द्यावा लागत होता. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला स्थैर्य लाभले होते.मात्र कालांतराने सहकार क्षेत्रात राजकारणाचा वाढता हस्तक्षेप, आर्थिक अडचणी आणि व्यवस्थापनातील समस्यांमुळे दूध संघाची स्थिती खालावली. विविध राजकीय नेत्यांनी दूध संघाला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. या परिस्थितीचा फायदा घेत खासगी दूध संस्थांनी जिल्ह्यात आपले जाळे विस्तारले आणि दूध खरेदी दरांवर त्यांचा प्रभाव वाढला.

सध्या जिल्हा दूध संघावर प्रशासकीय टप्प्यानंतर संचालक मंडळ अस्तित्वात आले असून, रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या कार्यकाळातच दूध संघाचे एनडीडीबीकडे हस्तांतरण करण्याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.एनडीडीबीकडे हस्तांतरण झाल्यास आधुनिक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, तांत्रिक सुविधा आणि दूध उत्पादकांना अधिक चांगल्या बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चांगला दर आणि स्थिर बाजारपेठ मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आता या प्रस्तावाबाबत शासन आणि संबंधित यंत्रणांचा अंतिम निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande