नेरळमध्ये उभारले अत्याधुनिक ग्रंथालय; १३ जून रोजी उद्घाटन
रायगड, 12 जून (हिं.स.) : ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत नेरळ येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालया’चे उद्घ
State-of-the-art library built in Neral; inauguration on June 13.


रायगड, 12 जून (हिं.स.) : ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत नेरळ येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालया’चे उद्घाटन शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

सम्राट युवक मंडळ, नेटा ग्लोबल फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सम्राट नगर, नेरळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन सहआयुक्त (गुप्तचर व अंमलबजावणी शाखा, मुंबई पोर्ट) अॅड. अर्थदीप सिंग (IRS) तसेच अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क विभाग अॅड. विजय मानवतकर (IRS) यांच्या हस्ते होणार आहे. तर अॅड. निखिल प्रभाकर मेष्राम (IRS), आयुक्त, सीजीएसटी कोलकाता हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना आणि वाचनप्रेमींना आवश्यक असलेली आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संदर्भग्रंथ, अभ्यासिका, शांत व अभ्यासपूरक वातावरण तसेच ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त साहित्य यामुळे हे ग्रंथालय परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

शिक्षणाच्या माध्यमातून युवकांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आणि समाजात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजक अॅड. सुमित साबळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान, समता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हे ग्रंथालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्यास विद्यार्थी, युवक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande