
रत्नागिरी, 12 जून (हिं.स.) । गुंतागुंतीची स्टोमा शस्त्रक्रिया आणि हेमीआर्थ्रोप्लास्टी (खुबा बदलणे) एकाच वेळी करून रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
श्रीमती आनंदी गंगाराम चव्हाण(वय - ८५ वर्षे, राहणार -परटवणे, रत्नागिरी) असे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांच्यावर एकाचवेळी गुंतागुंतीची अशी स्टोमा शस्त्रक्रिया आणि हेमीआर्थ्रोप्लास्टी (खुबा बदलणे) यशस्वीरीत्या करण्यात आली. ही दुर्मिळात दुर्मिळ शस्त्रक्रिया होती. कारण या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णास जोखीम जास्त असते. ही रुग्ण १२ मे २०२६ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खुबा बदलणे आणि Rectal Prolapse या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल झाली होती. संडासची जागा वारंवार बाहेर येणे (Rectal Prolapse) या आजारावरची शस्त्रक्रिया त्यांच्यावर यापूर्वी झाली होती. त्यांचा डावा खुबा फ्रॅक्चर झाला होता. शिवाय ब्लड प्रेशरचादेखील त्रास होता. अशा गंभीर परिस्थितीत दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करणे ही डॉक्टरांच्या कौशल्याची परीक्षाच होती. शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला पूर्ण भूल देणे अपेक्षित असते. मात्र रुग्णाची कार्डियाक कंडिशन चांगली नसल्यामुळे कमरेखालील भागापुरतीच भूल देण्यात आली होती. रुग्ण शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांमध्ये देखील गेल्या होत्या. मात्र शस्त्रक्रिया जोखीमची असल्याने त्यांना नकार देण्यात आला. त्यानंतर या रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या व काही आठवड्याच्या उपचारानंतर १९ मे २०२६ रोजी त्यांची शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, डॉ. जिज्ञासा भाटे (शल्यचिकित्सकशास्त्र विभाग प्रमुख), डॉ.निखिल देवकर (अस्थिव्यंगपचारशास्त्र विभाग प्रमुख), डॉ.जामशेर (भूलतज्ज्ञ), डॉ. प्रियांका यांच्या पथकाने केली, त्यांना या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
श्रीम.आनंदी गंगाराम चव्हाण यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना १० जून २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी