लातूर जिल्ह्यात जून ते डिसेंबरदरम्यान दोन महत्त्वपूर्ण आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणे
लातूर, 12 जून (हिं.स.) : राज्यातील जिल्हानिहाय अचूक आर्थिक व सामाजिक आकडेवारी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) यांच्या सहकार्याने अर्थ व सांख्यिकी आयुक्
सर्वेक्षणाला सुरुवात


लातूर, 12 जून (हिं.स.) : राज्यातील जिल्हानिहाय अचूक आर्थिक व सामाजिक आकडेवारी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) यांच्या सहकार्याने अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत लातूर जिल्ह्यात दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणे राबविण्यात येणार आहेत. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (पीएलएफएस) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (एएसयुएसई) ही सर्वेक्षणे जून २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत.

पीएलएफएस सर्वेक्षणाद्वारे रोजगार, बेरोजगारीचे प्रमाण, महिलांचा कामगारांमधील सहभाग, स्वयंरोजगार तसेच असंघटित क्षेत्रातील रोजगारासंदर्भातील अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती संकलित केली जाणार आहे. तर एएसयुएसई सर्वेक्षणामध्ये उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील (बांधकाम क्षेत्र वगळून) असंघटित उद्योग-व्यवसायांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणांतर्गत रोजगाराचे प्रकार, कार्यरत कामगारांची संख्या, उत्पादकता, वेतन, प्रती कामगार व प्रती उद्योग स्थूल मूल्यवृद्धी यांसारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशकांची नोंद केली जाईल. संकलित आकडेवारीच्या आधारे राज्य व जिल्ह्याच्या उत्पन्नाचा अधिक अचूक अंदाज बांधणे तसेच जिल्हास्तरीय विकास निर्देशांकांचे मापन करणे शक्य होणार आहे.

घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने 'इप्सॉस रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड' या संस्थेची नियुक्ती केली आहे. संस्थेचे अन्वेषक व पर्यवेक्षक निवडक कुटुंबे, उद्योग आणि व्यावसायिकांना भेट देऊन मुलाखतीद्वारे माहिती गोळा करणार आहेत. कुटुंबप्रमुख किंवा उद्योगप्रमुखांची भेट आवश्यक असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही काम करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.

या सर्वेक्षणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबाची व व्यवसायाची अचूक व अद्ययावत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. तसेच कोणताही संकोच न बाळगता सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना सहकार्य करून राष्ट्रीय व जिल्हास्तरीय विकास प्रक्रियेत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त उमाकांत हत्ते यांनी केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande