थकीत ऊस बिलासाठी लढा यशस्वी? १६ जूनपर्यंत रक्कम जमा करण्याचे आश्वासन
सोलापूर, 12 जून (हिं.स.)। धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे १८ दिवसांचे आंदोलन अखेर गुरुवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर १६ जूनपर्य
थकीत ऊस बिलासाठी लढा यशस्वी? १६ जूनपर्यंत रक्कम जमा करण्याचे आश्वासन


सोलापूर, 12 जून (हिं.स.)।

धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे १८ दिवसांचे आंदोलन अखेर गुरुवारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर १६ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति टन २,८०० रुपये दराने थकीत ऊस बिल जमा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.‘गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे हे आंदोलन सुरू होते. थकीत देयकांसाठी शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांत आंदोलनाची तीव्रता वाढवली होती. ४ जून रोजी शेकडो शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यानंतर १० जून रोजी कंबर तलाव येथे सुमारे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तसेच दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीला अरविंद घोडके, अमोल पाटील, बसवराज नरे यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

बैठकीतील चर्चेनंतर १६ जूनपर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर संघर्ष समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघर्ष समितीने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande