विधान परिषद रणधुमाळीत नवे समीकरण; सोलापुरात महायुतीची ताकद वाढली
सोलापूर, 12 जून (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र
Vidhan Parishad


सोलापूर, 12 जून (हिं.स.)।

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील पक्षाच्या राजकारणाला मोठा धक्का मानला जात आहे.यापूर्वी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमालाही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.भाजप आणि महायुतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने वसंतनाना देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या निर्णयानंतर पक्षात नाराजीचे सूर उमटू लागल्याची चर्चा आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना माघार घ्यावी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला खासदार ज्योती वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच काँग्रेसचे नेते व माजी आमदार धनाजी साठे उपस्थित होते.दरम्यान, महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला आमदार नारायण पाटील आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून आपल्या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांचा पाठिंबा राजेंद्र राऊत यांना असल्याचे जाहीर केले. या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वी सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande