
सोलापूर, 12 जून, (हिं.स.)। उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथे एका कथित बनावट डॉक्टरच्या उपचारामुळे ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात शंकर मनोहर पाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत गोविंद तानाजी सुतार (रा. विश्वासनगर, उपळाई ठोंगे) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, वडील तानाजी नरहरी सुतार (वय ६०) यांना कंबरेचा त्रास होत असल्याने गावातील शंकर मनोहर पाठक यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले होते.
पाठक यांनी दिलेल्या इंजेक्शननंतर त्यांच्या शरीरावर गाठ आली आणि प्रकृती खालावू लागली.यानंतर तानाजी सुतार यांच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर फिर्यादीने चौकशी केली असता, शंकर पाठक यांच्याकडे कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी, शिक्षण किंवा उपचाराचा परवाना नसल्याचे समोर आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच ते विनापरवाना रुग्णांवर उपचार करत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.मृत्यूचे नेमके कारण आणि वैद्यकीय अभिप्राय मिळण्यासाठी संबंधित कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आली होती. मात्र अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने फिर्यादीने थेट पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.या प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव करीत आहेत.'
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड