
पुणे, 12 जून (हिं.स.)। पुणे महापालिकेने शहरात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार, 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भातील वेळापत्रक पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आले.यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. उपलब्ध पाणीसाठा 20 ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे आवाहनही त्यांनी केले.पत्रकार परिषदेला सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप उपस्थित होते.
महापौर नागपुरे म्हणाल्या की, धरणांमध्ये सध्या पाच टीएमसी पाणी उपलब्ध असले तरी ते शहराच्या गरजांसाठी अपुरे आहे. मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय अपरिहार्य ठरला आहे. सोमवारपासून वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असून हॉटेल व रेस्टॉरंटनाही पाणी कपात लागू राहील.तसेच सोसायट्यांमध्ये वाहन धुण्यास मनाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर नळजोड घेऊन पाणी वापरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले की, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही एखाद्या भागात कमी पाणी मिळाल्यास तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. 2013-14 च्या तुलनेत यंदाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी बचतीला प्राधान्य द्यावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु