
* G7 परिषदेत 7 वेळा सहभागी होणारे पहिले भारतीय पंतप्रधान* ट्रम्प यांचीही भेट घेण्याची शक्यता
नवी दिल्ली, 13 जून (हिं.स.) - पंतप्रधान मोदी आजपासून 18 जूनपर्यंत सहा दिवसांच्या फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही सातवी फ्रान्स भेट आहे. 13-14 जून रोजी नीस शहरात ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, ‘इंडिया इनोव्हेट्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
भारत आणि फ्रान्सचे संबंध नेहमीच विश्वासाचे राहिले आहेत. या बैठकीत प्रामुख्याने संरक्षण सहकार्य आणि लष्करी क्षमता वाढवणे यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. सध्याच्या काळात हिंद-प्रशांत (Indo-Pacific) आणि इतर सागरी क्षेत्रांमध्ये वाढलेली सामरिक स्पर्धा पाहता, दोन्ही देश आपली सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र पावले उचलणार आहेत. याशिवाय, दोन्ही नेते ‘इंडिया इनोव्हेट्स’ (India Innovates) या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत, ज्यामध्ये भारत आणि फ्रान्समधील आघाडीचे स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटल फंड एकत्र येऊन भविष्यातील तंत्रज्ञानावर काम करतील.
या दौऱ्यातील दुसरा आणि सर्वात ऐतिहासिक टप्पा म्हणजे पंतप्रधान मोदींची स्लोव्हाकिया भेट असणार आहे. १४ ते १६ जून दरम्यान पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असतील. स्लोव्हाकियात पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतील. 1993 मध्ये स्लोव्हाकिया स्वतंत्र देश झाल्यानंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. १९९३ मध्ये चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन होऊन स्लोव्हाकिया हा स्वतंत्र देश बनल्यापासून, गेल्या ३३ वर्षांत या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण युरोपचे लक्ष लागले आहे. या ऐतिहासिक भेटी दरम्यान भारत आणि स्लोव्हाकियामध्ये व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि रेल्वे निर्मिती यांसारख्या मोठ्या क्षेत्रांमध्ये नवीन करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
१६ आणि १७ जून रोजी फ्रान्समधील ‘एव्हियान’ (Evian) येथे जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था असलेल्या देशांची म्हणजेच G-7 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भारत सदस्य नसला तरी, जागतिक राजकारणातील भारताचे वाढते वजन लक्षात घेऊन भारताला ‘विशेष आमंत्रित देश’ म्हणून बोलावण्यात आले आहे. येथे पंतप्रधान मोदी जागतिक शांतता, हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि अन्न साखळीतील अडथळे यांसारख्या गंभीर विषयांवर जगातील बड्या नेत्यांशी संवाद साधतील. या परिषदेत भारताची उपस्थिती हे सिद्ध करते की, जागतिक पातळीवर भारताच्या संमतीशिवाय आता कोणतेही मोठे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत.
दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात, १८ जून रोजी पंतप्रधान मोदी पॅरिसला पोहोचतील. युरोपमधील सर्वात मोठा आणि मानाचा तंत्रज्ञान उत्सव समजल्या जाणाऱ्या ‘विवाटेक समिट’ (VivaTech Summit) मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. येथे ते भारताच्या डिजिटल क्रांतीबद्दल आणि देशातील वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टिमबद्दल जगाला माहिती देतील. या दौऱ्याची सांगता पॅरिसमधील भारतीय समुदायाच्या एका भव्य मेळाव्याने होण्याची शक्यता आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी त्यांना भारताच्या विकास प्रवासात भागीदार होण्याचे आवाहन करतील, ज्यामुळे भारत आणि युरोपमधील सांस्कृतिक व भावनिक बंध अधिक घट्ट होतील.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात केवळ द्विपक्षीय संबंधच मजबूत होणार नाहीत, तर फ्रान्समध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित G7 शिखर परिषदेत भाग घेऊन पंतप्रधान मोदी जागतिक आव्हानांवर भारताची भूमिका मांडतील. विकसनशील देशांचा म्हणजेच ‘ग्लोबल साऊथ’चा एक बुलंद आवाज म्हणून या परिषदेत भारताकडे पाहिले जात आहे.
G7 म्हणजे ‘ग्रुप ऑफ सेव्हन’, जगातील त्या 7 देशांचा समूह आहे, ज्यांना जगातील 'आधुनिक अर्थव्यवस्था' असलेले देश म्हटले जाते. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, इटली, कॅनडा आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. आधी याचे नाव G8 होते. 2014 मध्ये रशियाने शेजारील देश क्रिमियावर कब्जा केला, तेव्हा इतर सदस्य देशांनी रशियाला गटातून बाहेर काढले. त्यामुळे याचे नाव G7 झाले.
G7 परिषदेत पंतप्रधान मोदींचा सर्वाधिक 7 वेळा सहभाग
पंतप्रधान मोदींना पहिल्यांदा 2019 मध्ये फ्रान्समधील बियारिट्झ येथे झालेल्या परिषदेत बोलावण्यात आले होते. त्यानंतर 2020 मध्ये अमेरिकेला यजमानपद भूषवायचे होते, परंतु अमेरिकेने तेव्हा परिषद रद्द केली. हे एक वर्ष वगळल्यास, 2019 ते 2024 पर्यंत दरवर्षी पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी झाले. 2021 मध्ये ते व्हर्च्युअल माध्यमातून यात सहभागी झाले. 2022 मध्ये जर्मनी, 2023 मध्ये जपान आणि 2024 मध्ये इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत ते सहभागी झाले. 2025 मध्ये कॅनडामध्ये झालेल्या परिषदेत ते सहभागी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी