
मुंबई, 13 जून (हिं.स.) - सरसकट कर्जमाफी, साताबारा कोरा करा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे (शप) आमदार रोहित पवार यांचे पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आद दुसरा दिवस होता. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. पण जोपर्यंत मागण्यांवर विचार होत नाही, तोपर्यंत आंदोलनात माघार घेणार नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मागण्यांची राज्य सरकारने दखल घेतल्याचे संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. रोहित पवार यांच्याशी दोन वेळा फोनवरुन चर्चा झाल्याचे सांगत भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. रोहित पवार यांच्या कर्जमाफी संदर्भातील मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावण्यात आली असून त्यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगतानाच, सर्वांचे समाधान होणार नसले तरी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.
दोन दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे माझा बीपी व्यवस्थित आहे मात्र शुगर कमी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असल्याचे रोहित पवार म्हणाले. कर्जमाफीतील काही जाचक अटी सरकारने घातल्यात. त्या मागे घेतल्याशिवाय आमचे अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांना चर्चेचे निमंत्रण दिले, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मी सरकारला आज अल्टीमेटम देणार नाही मात्र उद्या त्यांना अल्टीमेटम देणार. मुळात आता शेतकऱ्यांना या कर्जमाफिचा फसवेपणा कळत आहे. त्यामुळे कुठे काही झाले तर त्याला आम्ही जबाबदार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जो बैल दिला तो आजारी होता. त्याप्रमाणेच सरकारची कर्जमाफी देखील आजारी आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. यापूर्वी त्यांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हटले होते. तर सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला. आता सरकार याप्रकरणी कोणता तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीकविमा व शेतीसंबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना माजलगाव येथे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी मंत्र्यांची गाडी थांबवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.
कृषिमंत्री भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निवेदनावर बोलताना म्हटले की, ‘शेतकऱ्यांचं म्हणणं होतं, जी आपण कर्जमाफी दिली आहे त्यामध्ये सुधारणा करा. आमच्या भावना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. त्यांनी जे निवेदन दिले आहे ते मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. मला विश्वास आहे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. भरणे पुढे म्हणाले की, दोन अटी 100% आहेत, तिजोरीवर ताण असताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. रोहित दादांना एवढंच सांगतो मंगळवारी एकदा आपली बैठक होईल त्यातून नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल. आता मंगळवारची बैठक होऊ द्या, त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील. शेतकऱ्यांनाही आश्वासित करतो की, मी खरच सांगतो समाधान सगळ्यांचंच होणार नाही, पण खूप मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. चर्चा झाल्याशिवाय पर्याय निघणार नाही.
रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना मंत्री भरणे म्हणाले की, काल रात्री रोहित पवारांशी दोन वेळा फोनवरून बोललो आणि मुख्यमंत्र्यांशी पण बोललो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे की आपण त्यांची बैठक लावू. यामध्ये काय मार्ग काढता येईल रोहित दादांच्या काय मागण्या आहेत हे सगळं समजून घेऊ. मंगळवारी बैठक बोलावली आहे. मला विश्वास आहे मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. आम्ही आश्वासित करतो की शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. रोहित दादांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी