
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस,यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अरुणकुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते.
या चर्चासत्रात पुढे बोलताना यशवंत सिन्हा म्हणाले की, मोदी सरकार विकास दराचे जे आकडे मांडून श्रेय घेत आहे ते आकडेच मुळात चुकीचे आहेत. भारताचा विकास दर ७.७ टक्के आहे हे ते सांगत आहेत पण सत्य वेगळे आहे. या आकड्यावर अनेक अर्थतज्ञ शंका उपस्थित करतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या आकड्यांवर शंका उपस्थित करून भारताला ‘सी’ ग्रेड मध्ये टाकले आहे आणि भारताचे आकडे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असे स्पष्ट सुनावले आहे. विशेष म्हणजे ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांचाही नंबर ‘ए’ ग्रेड मध्ये आहे. गुंतवणूक वाढली तरच विकास दर वाढेल पण मागील १२ वर्षात गुंतवणूक ही जीडीपीच्या ३२ टक्क्यांच्या आसपास आहे, त्यात वाढ झालेली दिसत नाही, त्याच्या आधारे विकास दर ६ ते ६.५ टक्के होतो. सरकारने मांडलेले आकडे साफ चुकीच आहेत. २०४७ साल येता येता भारत विकसीत देश होईल असे मोदी सांगत आहेत पण त्यासाठी आपला विकासाचा दर हा ८ टक्क्यांच्या वर असला पाहिजे आणि सध्याचे आकडे पाहता ते उदिष्ट गाठता येणे फारच कठीण आहे. भारतासमोर हे संकट इराण युद्धामुळे आलेले नाही. सरकार डिझेलचे रेशनिंग करत आहे, रुपया कुठे चालला आहे? महागाई प्रचंड वाढली आहे. आणि स्टॉक मार्केटची अवस्थाही गंभीर आहे. मागील दोन वर्षात ३.२५ लाख कोटी रुपये देशातून बाहेर गेले आहेत. शेतकरी संकटात आहे. खतांची टंचाई आहे. ग्रामीण भागातील अवस्था अत्यंत बिकट बनत चालली होईल. शेतकरी संकटात येईल व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडेल.
भारताने याआधी अनेक मोठ्या संकटाचा सामना केला आहे आणि त्यातून देश पुन्हा ताकदीने उभा राहिला आहे. पंडित जवाहलाल नेहरु ते अटलबिहारी वाजपेयी पर्यंत सर्वच सरकारांनी संकटाचा मुकाबला केला पण सध्याच्या मोदी सरकारमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची इच्छाशक्तीच नाही. खोटे बोलून काम चालवले जात आहे. आज भारत सरकार अमेरिकेसमोर झुकले आहे, ते सांगतील तसेच केले जात आहे. पंतप्रधान अमेरिकेसमोर नतमस्तक आहेत आणि त्याचाही मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. अमेरिका इराण वादात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे, मग आपले विश्वगुरु कुठे आहेत? असा प्रश्नही यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी