
छत्रपती संभाजीनगर, 14 जून (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांच्या प्रचारार्थ बदनापूर येथे महत्त्वपूर्ण प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिरसाट यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत महायुती सरकारच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तसेच पायाभूत सुविधा, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये महायुती सरकारने विकासाची नवी दिशा दिल्याचा दावा करण्यात आला.
या विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देण्यासाठी विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
यावेळी उमेदवार सुहास शिरसाट, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis