तुकाराम मुंडे यांच्या नावाची चर्चा आणि धाक
लातूर, 14 जून (हिं.स.)। लातूर शहरात आज एक वेगळीच चर्चा रंगली. प्रशासनातील कडक आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांच्या नावाची चर्चा होताच शहरातील अनेक पान टपऱ्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. विशेष म्हणजे कोणतेही पथक आले नाही, कोणतीह
तुकाराम मुंडे


लातूर, 14 जून (हिं.स.)। लातूर शहरात आज एक वेगळीच चर्चा रंगली. प्रशासनातील कडक आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांच्या नावाची चर्चा होताच शहरातील अनेक पान टपऱ्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. विशेष म्हणजे कोणतेही पथक आले नाही, कोणतीही कारवाई झाली नाही; तरीही संभाव्य कारवाईच्या भीतीने अनेकांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली.

तुकाराम मुंडे यांची काम करण्याची पद्धत आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे त्यांची 'सिंघम' अशी प्रतिमा तयार झाली आहे. यापूर्वी विविध ठिकाणी त्यांनी केलेल्या कारवायांमुळे त्यांच्या नावाचा धाक प्रशासनाबरोबरच सर्वसामान्यांमध्येही निर्माण झाला आहे. त्याच प्रतिमेचा परिणाम आज लातूरमध्ये दिसून आला.

शहरातील नागरिकांमध्ये याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी नियमांचे पालन व्हावे यासाठी अशा कडक अधिकाऱ्यांची गरज असल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी केवळ अफवांमुळे किंवा चर्चेमुळे दुकाने बंद ठेवली जाणे हे चिंताजनक असल्याचे सांगितले. मात्र, दिवसाभरात या घटनेची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली.एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की, तुकाराम मुंडे यांचे नाव आजही प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता आणि कठोर कारवाईचे प्रतीक मानले जाते. प्रत्यक्ष कारवाई न करताही त्यांच्या नावामुळे निर्माण झालेला प्रभाव हा चर्चेचा विषय ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande