
बीड, 14 जून (हिं.स.) : धारूर ग्रामीण रुग्णालयात विद्युत शॉक लागलेल्या १४ वर्षीय मुलाला वेळेवर व योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दोन डॉक्टरांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी संबंधित दोन्ही डॉक्टरांना कार्यमुक्त (रिलीव्ह) करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या कारवाईवर समाधान व्यक्त न करता नागरिकांकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत शॉक लागलेल्या अल्पवयीन मुलाला उपचारासाठी धारूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तेथे आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मुलाला केज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माहिती घेण्यासाठी संपर्क साधलेल्या पत्रकारांशी वैद्यकीय अधीक्षकांनी अयोग्य वर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे मृत मुलाच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना तत्काळ चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी धारूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन प्राथमिक चौकशी केली.
चौकशीत संबंधित डॉक्टर मुख्यालयात अनुपस्थित राहणे, रुग्णसेवेत अपेक्षित तत्परता न दाखवणे तसेच जनतेशी वर्तनाबाबत तक्रारी आढळून आल्याचे सांगितले जाते. यानंतर दोन्ही डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले.
मात्र, या गंभीर प्रकरणात केवळ कार्यमुक्त करण्याची कारवाई पुरेशी नसून अधिक सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis