रेमंड कंपनीतील कामगारांच्या समस्यांवर आ. वानखडेंची व्यवस्थापनासोबत बैठक
अमरावती, 14 जून (हिं.स.) : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीतील कामगारांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश वानखडे यांनी शनिवारी कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कामगारांवर कोणत्याही प्रकार
रेमंडच्या कामगारांवरील अन्याय अमान्य आ. वानखडे यांनी व्यवस्थापनाला फटकारले


अमरावती, 14 जून (हिं.स.) : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीतील कामगारांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश वानखडे यांनी शनिवारी कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय, मानसिक त्रास अथवा दबाव टाकण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी व्यवस्थापनाला दिला.

कामगारांनी सादर केलेल्या निवेदनात कंपनी व्यवस्थापनाकडून काही कामगारांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामगारांवर अन्याय होत असल्याची तक्रारही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार वानखडे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामगारांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बोलताना आमदार वानखडे यांनी सांगितले की, कामगारांच्या हक्कांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास कामगार कायद्याअंतर्गत संबंधित कंपनी व्यवस्थापनाला जबाबदार धरले जाईल. स्थानिक कामगारांना न्याय मिळणे आवश्यक असून, उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कंपनीत किमान ८० टक्के रोजगार स्थानिक युवकांना देण्याबाबत त्यांनी भर दिला. तसेच या बाबीकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रेमंडसह एमआयडीसीतील इतर काही कंपन्यांमध्येही स्थानिक कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे नमूद करत, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि सन्मानजनक वागणूक मिळणे गरजेचे असल्याचे आमदार वानखडे यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला कामगारांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने, तिवसा नगरपंचायतीचे नगरसेवक प्रकाश पडोळे, कंपनी हेड विकास राजा, एचआर अधिकारी गणेश शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी, कामगार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande